
नवी मुंबई (मंगेश जाधव वेळबंकर)
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गणेशवाडी परिसरात गुरुवारी सकाळी १० फूट लांब महाकाय अजगर आढळून आला. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ सर्पमित्रांना माहिती दिल्यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेत अजगराला सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
गणेश चव्हाण व दिनेश चव्हाण यांच्या घराशेजारी असलेल्या कुंपणात हा अजगर सापडला. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे कोणतीही हानी न होता सर्पमित्र अरमान मुजावर (शृंगारतळी) व पप्या चव्हाण यांनी धाडसाने अजगराला पकडले. या मोहिमेत वनविभागाचे रानवी वनरक्षक सिध्देश्वर गायकवाड, आबलोली वनरक्षक कुमार पवार तसेच पिंट्या गुरव व बाळू चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
अरमान मुजावर यांनी तालुक्यात आतापर्यंत अनेक सर्प व सरपटणारे प्राणी सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले आहेत. त्यांच्या या कार्याची ग्रामस्थांनी स्तुती केली आहे.
दरम्यान, सध्या पावसाळ्यात विविध सरपटणारे प्राणी मोकळ्या परिसरात दिसून येत असून ग्रामिण भागात यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सर्पमित्रांची उपस्थिती अत्यावश्यक असून, गुहागर तालुक्यात अधिकृत सर्पमित्रांची कमतरता आहे. त्यामुळे वनविभागाने तालुक्यात अधिकृत सर्पमित्रांची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.




