आयडियल एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी तर्फे शिक्षक तन्वीर अहमद बागलकोटे यांना आदर्श शिक्षक प्रदान
मित्रपरिवार व सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
संपादक जमालुद्दीन बंदरकर
प्रतिनिधी – शाहिद अहमद तुळवे, संगमेश्वर
आयडियल एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, रत्नागिरी संचलित अजीजा दाऊद नाईक हायस्कूलमध्ये नुकत्याच आयोजित शालेय अंतर्गत सन्मान समारंभात शिक्षक श्री.तन्वीर अहमद मुसा बागलकोटे यांना त्यांच्या शैक्षणिक योगदानासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री. तन्वीर अहमद बागलकोटे यांनी आपल्या १८ वर्षांच्या अध्यापन सेवेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील घडणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची आवड निर्माण केली असून, स्पर्धा परीक्षा तयारी, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक जाणीव वाढविणाऱ्या कार्यक्रमांत सातत्याने सहभाग नोंदविला. त्यांच्या या कार्याला शालेय स्तरावर गौरवण्यात आले.
सन्मान समारंभात संस्थेच्या ट्रस्टी श्रीमती रुबिना रफीक नाईक, संस्थाध्यक्षा कुमारी अम्ब्रीन रफीक नाईक, उपाध्यक्ष श्री.मुनीर शेख, तसेच हेडमास्टर श्री. समीर गडबडे यांच्यासह संचालक मंडळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी श्री.तन्वीर अहमद बागलकोटे यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचा विद्यार्थ्यांवर आणि समाजावर होणारा सकारात्मक परिणाम अधोरेखित केला.
या वेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अशा प्रकारचे सन्मान शिक्षकांना नवीन ऊर्जा देतात. सेवाभावी वृत्ती, निष्ठा आणि परिश्रम यामुळेच श्री. तन्वीर अहमद बागलकोटे यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला असून, हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरेल.



