चिपळूण मध्ये कुत्र्यांचे सर्रास वावर : नागरिकांत भीतीचे वातावरण
नगर परिषदेवर नागरिकांचा रोष

संगमेश्वर प्रतिनिधी-शाहिद अहमद तुळवे
चिपळूण शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांचे जगणे असुरक्षित बनले आहे. गोवळकोट रोड, पेठमाप, बाजारपेठ, काविलतळी आणि पाग नाका या परिसरांत सकाळ-संध्याकाळ कुत्र्यांची टोळकी फिरताना दिसतात. बाजार, शाळा-कॉलेज किंवा पहाटे व्यायामासाठी जाणेही आता धोक्याचे ठरत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच होताना दिसत आहे. शाळकरी मुलांना कुत्र्यांची भीती सतत त्रास देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर चालताना या कुत्र्यांच्या टोळक्यांचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः गोवळकोट रोड, गुहागर बायपास, बाजारपेठ, इंदिरा गांधी संस्कृती केंद्र, मार्कंडी आणि काविलतळी भागात कुत्र्यांचा उच्छाद अधिक असून नागरिक सतत धास्तावलेले आहेत. रात्रीच्या वेळी चिंच नाका, भाजी मंडई, पेठमाप आणि गोवळकोट रोडवरून जाणे म्हणजे अक्षरशः जीव मुठीत धरून चालण्यासारखे झाले आहे, अशी स्थानिकांची व्यथा आहे. मुरादपूर आणि पाग भागातील रहिवाशांनाही हीच भीषण समस्या सतावत असून लहान मुलांच्या सुरक्षिततेबद्दल पालक कायमच चिंतेत आहेत.
दरम्यान, नगर परिषदेवर नागरिकांचा रोष वाढू लागला आहे. प्राणी संरक्षण कायद्यामुळे कुत्र्यांना उचलणे किंवा इतरत्र हलवणे शक्य नसल्याचे कारण प्रशासन देत असले तरी, बंध्याकरण व लसीकरण मोहिमेत मोठी ढिलाई होत असल्याची नागरिकांची टीका आहे. अनेकदा तक्रारी करूनही ठोस पावले न उचलल्याने लोकांचा संयम सुटू लागला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास हा प्रश्न गंभीर वळण घेईल. भटक्या कुत्र्यांपासून सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करणे आता अधिकच अत्यावश्यक झाले आहे.”




