
खेड : तालुक्यातील मिसाळवाडी येथील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार भास्करराव जाधव यांच्या प्रयत्नातून नवी शाळा इमारत उभारण्यात आली. जुन्या इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण झाल्यामुळे पालक व ग्रामस्थांच्या तक्रारी वाढल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याने ग्रामस्थांनी आमदार जाधव यांच्याकडे नवी इमारत उभारून देण्याची मागणी केली होती.
काही महिन्यांपूर्वी गावभेटी दरम्यान ग्रामस्थांनी केलेल्या मागणीस तात्काळ प्रतिसाद देत आमदार जाधव यांनी निधी मंजूर करून दिला. त्यानंतर बांधकामाची गतीमान कामे हाती घेण्यात आली. अल्पावधीतच उभारण्यात आलेली ही भव्य व सुसज्ज इमारत आता विद्यार्थ्यांच्या सेवेत उपलब्ध झाली आहे.
या नव्या शाळा इमारतीचे उद्घाटन सोहळा काल मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांमध्ये श्री. शंकरराव कांगणे, श्री. मधुकर शिरगावकर, गावचे उपसरपंच श्री. अशोक कदम, श्री. विजय राक्षे, श्री. देवेंद्र मोरे, श्री. बशीर हमदुले, गटशिक्षणाधिकारी श्री. वाईत यांची उपस्थिती होती. तसेच ग्रामस्थ, पालक, शिक्षक व शाळकरी मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती.
कार्यक्रमात बोलताना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, “शिक्षण हीच खरी ताकद आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. गावागावांत शैक्षणिक सुविधा उभारणे आणि मुलांना योग्य वातावरण मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे.”
ग्रामस्थांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत शैक्षणिक सुविधा सुधारण्यासाठी उचललेले हे पाऊल मिसाळवाडी साठी मोठी जमेची बाजू असल्याचे सांगितले. पालकांनीही आपल्या मुलांना आता सुरक्षित व आधुनिक शाळा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक शिक्षकांनी केले तर शेवटी उपस्थित पाहुण्यांचे आभार गाव समितीच्या वतीने मानले.




