चिपळूण हायटेक बसस्थानकाचा ‘पत्रा प्लॅन’म्हणजे निर्लज्जपणाचा बाजार-माजी सभापती शौकतभाई मुकादम
दिला आंदोलनाचा इशारा

चिपळूण : चिपळूण हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे.गेली ८ वर्षे चिपळूण हायटेक बसस्थानकाचे काम सुरु असून आजतगायत ते पूर्ण झालेले नाही.आता त्याच्यावर ‘पत्रा प्लॅन’ करण्यात येणार असल्याचे समजते.हा अक्षरशःनिर्लज्जपणाचा बाजार असल्याचा आरोप करत माजी सभापती शौकत मुकादम यांनी या प्रकारावर कमालीचा संताप व्यक्त केला आहे.जनतेची चेष्टा करू नका.पूर्वीच्या प्लॅन प्रमाणे चिपळूण बसस्थानक हायटेकच झाले पाहिजे,अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल,असा थेट इशाराही त्यांनी एस्.टी महामंडळाला दिला आहे.निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करत एस्.टी महामंडळाने चिपळूण हायटेक बसस्थानक कामाचे पुरते वाटोळे लावले आहे.त्यातच आता मंजूर आराखडा बदलून इमारतीवर स्लॅब ऐवजी पत्राशेड उभारण्याचा निर्णय घेतला असल्याने चिपळुणात प्रवाशांसह राजकीय पुढारी व पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.माजी सभापती शौकत मुकादम यांनीही या प्रकाराची दखल घेत आपला रोष व्यक्त केला आहे.ते पुढे म्हणाले, चिपळूण आगाराचे पूर्वीचे बसस्थानक हे अतिशय चांगले होते.ते हायटेक बसस्थानक होणार म्हणून तोडले गेले.आता नवीन सुरु असलेल्या कामावर पत्रा प्लॅन करणार म्हणजेच चिपळूणची जनता व प्रवाशी यांच्या नजरेत धूळ फेकीचा प्रकार झाला आहे.जिल्ह्यातील इतर भागात कोट्यावधीचा निधी खर्च करुन विविध प्रकल्प उभे केले जातात.मग कोकणातील चिपळूण सारख्या महत्वाच्या व मध्यवर्ती ठिकाणी हायटेक बसस्थानक होऊ शकत नाही का?असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.महाराष्ट्र शासनाने अनेक रेल्वे स्थानकामध्ये करोडे रुपये खर्च करुन सुशोभीकरण केले.गरीबांची सेवा देणारी एस्.टी.बस स्थानकावर महाराष्ट्र शासन हायटेक बस स्थानकावर खर्च करु शकत नाही का?त्यामुळे हायटेक बस स्थानकाला निधीची तरतूद झाली पाहिजे.पूर्वीच्या प्लॅन प्रमाणेच चिपळूणमध्ये हायटेक बस स्थानक झाले पाहिजे,अन्यथा आम्हाला सर्व पक्षीय आंदोलन छेडावे लागेल,असा इशारा देखील श्री.मुकादम यांनी प्रशासनाला दिला आहे.




