
चिपळूण (वार्ताहर) : मिरजोळी गावचे आदर्श सरपंच कासम नूरमहमद दलवाई यांचे बुधवार दि.२४ डिसेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. निधन समयी ते ६९ वर्षाचे होते. सन २०१९-२५ या पाच वर्षाच्या कार्यकाळात गावातील अंतर्गत रस्ते, गटारे, स्मशानभूमी, पाणी योजना, जिल्हा परिषद डिजिटल शाळा सुरू करणे आदी कामे पूर्ण करत गावातील अनेक विकासकामात त्यांचे मोठे योगदान आहे.
सन २०१९ मध्ये मिरजोळी ग्रामपंचायतमध्ये कासम दलवाई यांचे पॅनल निवडून येऊन ते सरपंच पदावर विराजमान झाले. त्यानंतर चार वर्षात त्यांनी गावाचे सुजलाम सुफलाम केले असून मिरजोळी गावाची कायापालट केली आहे. मिरजोळी गावात विकासकामाची गंगा आणली आहे. गावामध्ये त्याने आदर्श निर्माण केला आहे. मिरजोळी गाव चिपळूण शहर लगात असल्याने गावाचा विकास झपाटाने वाढत आहे. याबाबत बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सदनिका धारकांना कचऱ्याची मोठी समस्या असल्याचे त्यांचा लक्षात आल्याने त्याने कचरा प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले. गावातील ग्रामस्थांचा विरोध असताना श्री. दलवाई यांनी लोकांची समजूत काढून घंटागाडी सुरू करून कचऱ्याची समस्या सोडवली आहे. मिरजोळी गावात अनेक वाड्या डोंगर भागात वसलेल्या आहेत. त्यामुळे गावात पाण्याची मोठी समस्या आहे. निवडून आल्यानंतर श्री. दलवाई व त्यांच्या कमिटीने महिलांच्या डोक्यावरचे हांडे उतरू असे जाहीरनाम्यात मांडले होते. मिरजोळी गावात पाण्याची समस्या सुद्धा सोडवण्याचा त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या अकाली निधनाने गावावर शोकाकुल पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातू, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.




