शिस्तबद्ध विकास व सौजन्यशील स्वभावावर विश्वास ठेवत डॉ.अब्बास जबले व डॉ.रहमत जबले राष्ट्रवादीत स्वगृही परत
आमदार शेखर निकम यांनी केले त्यांचे स्वागत

- चिपळूण : कालूस्ते, चिपळूण येथील सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले डॉ. अब्बास जबले (माजी सरपंच) व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शहराध्यक्षा डॉ. रहमत जबले यांनी आमदार शेखर निकम यांनी आजवर केलेल्या शिस्तबद्ध, नियोजनबद्ध विकासकामांवर तसेच कोणालाही न दुखावणाऱ्या त्यांच्या सौजन्यशील स्वभावावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटात प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजेच त्यांचे सन्मानाने आणि विश्वासाने स्वगृही परतणे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी आमदार शेखर निकम यांनी डॉ. जबले बंधूंशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या सामाजिक व स्थानिक अडचणी जाणून घेतल्या. त्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करत संबंधित बाबी सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. समाजासाठी सेवाभाव जपणाऱ्या व्यक्तींचे पक्षात स्वागत करताना आमदार निकम यांनी “सेवा, विकास आणि विश्वास” या मूल्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठामपणे उभी आहे, असे मत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, समीर काझी, इम्रान कोंडकरी, पांडूशेठ माळी, खालीद दाभोळकर, लतीफभाई परकार, इम्रान खतीब, सचिन पाटेकर, इमाम शाह, नूरबाई बिजले, मनोज जाधव, जमीर काझी, प्रभाकर सैतवडेकर, सुदेश पवार, राजेंद्र काणेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. अब्बास व डॉ. रहमत जबले यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक बांधिलकीला नवी ऊर्जा मिळाली असून, कालूस्ते व चिपळूण परिसरातील विकासाला आणखी बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



