कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस धोरणांची गरज- आ.शेखर निकम यांची अधिवेशनात मागणी
*कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस धोरणांची गरज – आमदार शेखर निकम यांची मागणी
===================
*अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025-26*
अर्थसंकल्पीय अधिवेशनात *राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आमदार शेखर निकम यांनी कोकणाच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासासाठी शासनाने ठोस व परिणामकारक पावले उचलावीत, अशी आग्रही भूमिका मांडली.*
पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी ३६६१ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केल्याबद्दल त्यांनी शासनाचे अभिनंदन केले. कसबा येथे उभारण्यात येणारे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रस्तावित ३१३ कोटी रुपयांच्या निधीला येत्या अर्थसंकल्पात गती द्यावी, अशी मागणी केली. या स्मारकामुळे तरुण पिढीला इतिहासाची प्रेरणा मिळेल, तसेच पर्यटनालाही चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
कोकणातील आंबा व काजू पिकांवर हवामान बदलाचा गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यंदा मोहर गळाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच आफ्रिकन काजू आयातीमुळे स्थानिक उत्पादकांवर अन्याय होत असल्याने आयात शुल्क वाढविण्याचा विचार करावा, असेही त्यांनी सुचवले.
बांबू शेतीला कृषी पिकाचा दर्जा देऊन कोकणात ‘बांबू हब’ उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे कॅनबॅक संस्थेचे संजिव करपे यांनी बांबू प्रक्रियेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प उभारले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. बांबू प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती व उत्पन्नवाढ शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पूरनियंत्रणाच्या उपाययोजनांवर बोलताना चिपळूणसारख्या भागात वारंवार पूरस्थिती निर्माण होत असल्याने स्थानिक प्रतिनिधींना नियोजन समित्यांमध्ये स्थान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पानंद रस्त्यांच्या निकषांमध्ये शिथिलता आणून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोकण हा केवळ निसर्गसंपन्न प्रदेश नसून महाराष्ट्राच्या विकासाचे इंजिन ठरू शकतो. पर्यटन, शेती, फूड प्रोसेसिंग, बांबू उद्योग आणि पायाभूत सुविधा यांचा एकत्रित विचार करून कोकणाचा संतुलित विकास साधावा, असे आवाहन करत त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचे स्वागत व अभिनंदन केले.




