उद्या १३ फेब्रुवारी पासून मांडकी पालवण येथे ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन
ग्रामीण व कृषी साहित्याला नवी दिशा मिळणार

🟣*उद्यापासून मांडकी–पालवण येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन*
*सावर्डे :* महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक जडणघडणीत ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. या तिन्ही क्षेत्रांचे साहित्यिक, वैचारिक व अनुभवाधारित दर्शन घडवणारे राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन मांडकी–पालवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे दि. १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था यांच्या वतीने संस्थेच्या प्रशस्त क्रीडांगणावर हे भव्य संमेलन संपन्न होणार असून सर्व साहित्यप्रेमींनी तिन्ही दिवस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले आहे.
या संमेलनातील ग्रंथदिंडी हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. ग्रंथदिंडीद्वारे साहित्य आणि विचारांची शोभायात्रा काढण्यात येणार असून ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार या विषयांवर आधारित साहित्याचा जागर करण्यात येणार आहे. या माध्यमातून समाजजीवनाशी निगडित प्रश्नांवर चर्चा होऊन उपस्थितांना नवे दृष्टिकोन व वैचारिक प्रेरणा मिळेल, असा विश्वास डॉ. भावे यांनी व्यक्त केला.
संमेलनादरम्यान ग्रामीण साहित्य, कृषी सुधारणा, सहकार चळवळ आणि कोकणातील सांस्कृतिक वारसा या विषयांवर आधारित परिसंवाद, कवी संमेलन, पुस्तक प्रदर्शन, मुलाखती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण जीवनातील बदल, सहकारातील मूल्ये तसेच साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन या विषयांवर नामवंत साहित्यिक, कृषी तज्ज्ञ व सहकार क्षेत्रातील मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. त्यामुळे हे संमेलन केवळ साहित्यिकच नव्हे तर सामाजिक व वैचारिक आंदोलनाचे केंद्र ठरणार आहे.
या राज्यस्तरीय संमेलनात अभिनेते संजय खापरे व हास्यजत्रा फेम अभिनेते प्रभाकर मोरे यांची विशेष उपस्थिती लाभणार असून त्यांच्या उपस्थितीमुळे संमेलनाच्या उत्साहात अधिक भर पडणार आहे. “साहित्यातील शब्दांचा उत्सव, शेतीचा संघर्ष आणि सहकारातून समृद्धी या विषयांवर नामवंत साहित्यिकांचे विचार ऐकण्याची ही उत्तम संधी आहे. महाराष्ट्रातील सर्व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन अभिनेते संजय खापरे यांनी केले आहे. तसेच प्रभाकर मोरे यांनीही साहित्यप्रेमींना या संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे, स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. संजय भावे (कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली), तर प्रमुख कार्यवाह म्हणून डॉ. निखिल चोरगे काम पाहणार आहेत. संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे असून राज्यभरातील नामवंत साहित्यिक, कृषी तज्ज्ञ व सहकार क्षेत्रातील मान्यवर या संमेलनात सहभागी होणार आहेत.
संमेलनाच्या लोगोचे अनावरण कवी केशवसुत स्मारक, मालगुंड (ता. संगमेश्वर) येथे करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा रत्नागिरीच्या अध्यक्षा व रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते लोगोचे अनावरण झाले. ग्रामीण, कृषी व सहकार या तीन विषयांवर आधारित साहित्य संमेलन महाराष्ट्रात प्रथमच आयोजित होत असल्याने हा उपक्रम ऐतिहासिक ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या प्रसंगी संयोजन समितीच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमास मालगुंडच्या सरपंच सौ. श्वेता थेऊर, संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, नियोजन समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह निखिल चोरगे, कोषाध्यक्ष अजय चव्हाण तसेच कवी केशवसुत स्मारकाच्या कार्यवाह नलिनी खेर उपस्थित होत्या.
संमेलनाच्या प्रसिद्धी व प्रचार प्रमुख डॉ. शमिका चोरगे यांनी ग्रामीण, कृषी व सहकार चळवळीतील कार्यकर्ते तसेच साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. तसेच संस्थेच्या संचालिका व स्मरणिका संपादिका अंजलीताई चोरगे यांनी महाराष्ट्रासह रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व साहित्यप्रेमींनी या ऐतिहासिक संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
ग्रामीण जीवन, शेती, सहकार आणि मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेचा जागर करणारे हे संमेलन कोकणातील साहित्यिक, शेतकरी, विद्यार्थी व रसिकांसाठी वैचारिक व सांस्कृतिक पर्वणी ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या संमेलनामुळे ग्रामीण व कृषी साहित्याला नवी दिशा मिळेल, तसेच समाजातील विविध घटकांमध्ये विचारांची देवाणघेवाण घडून येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
🔹 *प्रमुख पाहुणे*
उद्घाटक : मा. खासदार शरदचंद्रजी पवार
प्रमुख पाहुणे : मा. ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री
समारोप अध्यक्ष : मा. ना. देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री
इतर प्रमुख पाहुणे
मा. ना. डॉ. उदयजी सामंत – उद्योग व मराठी भाषा मंत्री, पालकमंत्री रत्नागिरी
मा. ना. योगेशजी कदम – गृहराज्य मंत्री
डॉ. सदानंद मोरे – अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ
प्रा. मिलिंद जोशी – अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
संमेलन प्रमुख पदाधिकारी
संमेलनाध्यक्ष : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे
स्वागताध्यक्ष : डॉ. संजय भावे, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
प्रमुख कार्यवाह : डॉ. निखिल चोरगे
संयोजन समिती अध्यक्ष : प्रकाश देशपांडे
विशेष निमंत्रित
मा. खासदार नारायणराव राणे
मा. खासदार सुनीलजी तटकरे
मा. आमदार भास्करराव जाधव
मा. आमदार शेखरजी निकम
मा. आमदार किरणजी सामंत
मा. आमदार निरंजनजी डावखरे
मा. आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे
(मा. शरदचंद्रजी पवार व मा. नारायणराव राणे यांच्या प्रकृतीमुळे उपस्थितीबाबत अनिश्चितता)
🔹 *कार्यक्रम पत्रिका*
📅 शुक्रवार – दि. 13 फेब्रुवारी 2026
दुपारी 3.00 वा. – ध्वजारोहण
दुपारी 3.30 वा. – ग्रंथदिंडी
सायंकाळी 5.30 वा. – ग्रंथप्रदर्शन उद्घाटन
सायंकाळी 6.00 वा. – स्थानिक कवींचे कवी संमेलन (कवी कट्टा)
📅 शनिवार – दि. 14 फेब्रुवारी 2026
सकाळी 10.00 वा. – संमेलनाचे उद्घाटन
दुपारी 12.00 ते 1.30 – परिसंवाद : ग्रामीण साहित्यातील कोकण
दुपारी 1.30 ते 2.30 – भोजन
दुपारी 2.30 ते 4.00 – परिसंवाद : ग्रामीण साहित्य – काल, आज व उद्या
सायंकाळी 4.00 ते 4.30 – चहापान
सायंकाळी 4.30 ते 6.00 – ग्रामीण कथाकथन
सायंकाळी 6.00 ते 7.30 – सहकार साहित्य व सहकारातून समृद्धी
सायंकाळी 7.30 ते 9.00 – ग्रामीण कवी संमेलन
रात्री 9.00 ते 10.00 – भोजन
रात्री 10.00 नंतर – सांस्कृतिक कार्यक्रम
📅 रविवार – दि. 15 फेब्रुवारी 2026
सकाळी 9.00 ते 10.00 – स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम
सकाळी 10.00 ते 11.00 – परिसंवाद : कृषी साहित्य व शेती सुधारणा
सकाळी 11.00 ते 12.30 – सहकार विषयक मुलाखत
दुपारी 12.30 ते 1.00 – परिसंवाद : आता आत्महत्या थांबवूया
दुपारी 1.00 ते 2.00 – मान्यवरांचा सत्कार
दुपारी 2.00 ते 3.00 – भोजन
दुपारी 3.00 ते 5.00 – प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा
सायंकाळी 5.00 वा. – समारोप समारंभ होईल.




