- पुणे-लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू आणि ‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक जयंतराव टिळक (वय-७४) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. आज बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले असून टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेला.
डॉ. दीपक टिळक यांच्या पश्चात काँग्रेस नेते असलेले सुपुत्र रोहित टिळक, कन्या, नातवंडे असा परिवार आहे. आज (बुधवारी) सकाळी 8 ते 11 वाजताच्या दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात आले होते. तर दुपारी बारा वाजल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. दीपक टिळक हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू होते. त्यांनी ‘केसरी’चे विश्वस्त संपादकपद भूषवले आहे. डॉ. दीपक टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते.
2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेतृत्व करणारे स्वर्गीय जयंतराव टिळक यांचे ते सुपुत्र होते. जयंतराव टिळक हे 12 वर्षे संसद सदस्य (राज्यसभा) आणि 16 वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष होते. दीपक टिळक हे स्वर्गीय इंदुताई टिळक यांचे पुत्र. त्या एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या होत्या. सेवा सदन आणि हुजूर पागा सारख्या अनेक शैक्षणिक संस्थांच्या त्या मार्गदर्शक होत्या. अशाप्रकारे कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे दीपक टिळक यांना बालपणापासूनच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये रस निर्माण झाला होता.
Back to top button
error: Content is protected !!