अंजनवेल विद्यालयात गुहागर आगार प्रमुख अशोक जी चव्हाण यांचा सत्कार
विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात सत्कार संपन्न

नवी मुंबई (मंगेश जाधव वेळबंकर)
डॉ.तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान संचालित दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय आणि भगिर्थिबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज अंजनवेल तालुका गुहागर या विद्यालयात गुहागर आगार प्रमुख श्री अशोक.चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
विद्यालयातील इयत्ता दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर आगाराचे व्यवस्थापक श्री अशोक चव्हाण उपस्थित होते.अंजनवेल विद्यालय परिसरातील वेलदुर गावी असंख्य वर्ष एस टी सेवा सुरू नव्हती.ग्रामस्थ व विद्यार्थी वर्गाला असंख्य वर्ष पायी प्रवास करावा लागत होता.विद्यार्थ्यांना शाळा ,कॉलेज या ठिकाणी जाण्यासाठी पायपीट करावी लागत होती मात्र अंजनवेल विद्यालयातील मुख्याध्यापक मंगेश गोरिवले आणि वेलदुर गावातील सामाजिक कार्यकर्ते यांचा सततचा पाठपुरावा चालू होता आणि त्याला विद्यार्थी हित लक्षात घेता आगार प्रमुख श्री अशोक चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.त्यामुळे एस टी बस सुरू झालीआहे.यानिमित्त आगार प्रमुख यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
प्रथम वेलदुर घरटवाडी जावळेवाडी येथे आगार व्यवस्थापक श्री चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.त्यानंतर अंजनवेल विद्यालयात झांज पथक वाजवून आगार व्यवस्थापक यांचे भव्य स्वागत करण्यात आले.श्री.चव्हाण यांच्या हस्ते इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.श्री.चव्हाण यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी आगार व्यवस्थापक श्री चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तालुक्यात कोणताही विद्यार्थी एस टी मुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाही.गावागावात बस सेवा सुरू करून विद्यार्थी आणि शिक्षण यांचे नाते घट्ट करून कोकणातून प्रशासकीय अधिकारी निर्माण व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाला ग्रामस्थ ,पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.उदय दामले आणि आभार दिपाली कांबळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले




