विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सन्मान सोहळा व विशेष मार्गदर्शन कार्यक्रम
चिपळूण मुस्लिम समाज या संस्थेचे प्रेरणादायी पाऊल

चिपळूण मुस्लिम समाज, चिपळूण यांच्या वतीने समाजातील शालेय व महाविद्यालयीन परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार दि. 27 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता मल्टीपर्पज सेंटर, चिपळूण मुस्लिम समाज, चिपळूणच्या सभागृहात(लाईफ केयर हॉस्पिटल जवळ) साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम समाजाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतिक असून, गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे जागतिक दर्जाचे मार्गदर्शक व काउन्सलर श्री. ऐहसान शेख यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन. विद्यार्थ्यांना जीवनात योग्य दिशा व आत्मविश्वास मिळावा, या हेतूने ते उपस्थित राहून संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमात समाजातील अनेक मान्यवर, शिक्षकवर्ग, मार्गदर्शक व पालकगण मोठ्या संख्येने सहभागी होणार असून विद्यार्थ्यांना केवळ सन्मानच नव्हे, तर यशाच्या पुढील वाटचालीसाठी अमूल्य प्रेरणा मिळणार आहे. या प्रेरणादायी सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चिपळूण मुस्लिम समाज या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.



