महाराष्ट्र

सोलापुरात मुसळधार पावसाचा कहर : रस्त्यांना नद्यांचा स्वरूप

घरात शिरलं पाणी : नागरिकांना रात्र जागून काढण्याची वेळ

सोलापूर-सोलापूर शहर व परिसरात रात्रभर विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
रात्रीच्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुना विडी घरकुल, मित्र नगर, शेळगी या भागांमध्ये पाणी घरात घुसल्याने स्थानिक नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक घरांमध्ये 2-3 फूटपर्यंत पाणी घुसल्याचे दृश्य पाहायला मिळाले. शहरातील मुख्य रस्ते, विशेषतः सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील पंजवानी मार्केटसमोर महामार्गांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. सर्व्हिस रोडने प्रवास करणाऱ्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे पाहायला मिळाले.
शहरातील 256 गाळा परिसरात पाणी शिरले आहे. ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात घुसले, त्यामुळे अनेकांना रात्रभर जागून काढावी लागली. सध्या महानगरपालिकेचे कर्मचारी ड्रेनेज सफाईचे काम करताना या परिसरात दिसून येत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बसे स्वतः फिल्डवर उतरले आहेत. मित्रनगर शेळगी भागात स्वतः आयुक्त ओम्बसे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पाहणी करत आहेत. सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द, सांगवी बुद्रुक, चपाळगाव, चुंगी या गावांमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाची नोंद झाली. जुलै-ऑगस्टमध्ये आधीच भरून वाहणारे ओढे-नाले रात्रीच्या पावसामुळे ओव्हरफ्लो झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!