जुन्या आठवणींनी उजळले महाराष्ट्र हायस्कूल चिपळूणचे स्नेहसंमेलन
२००१-२००२ च्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अनुभवले जुने दिवस
चिपळूण एज्युकेशन सोसायटी संचलित महाराष्ट्र हायस्कूल चिपळूणचे 2001 -2002 बॅचचे स्नेहसंमेलन मनात कायम राहतील अशा आठवणींनी रंगून गेले. संस्थेचे पदाधिकारी, आजी-माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि क्षणभरातच सर्वांना शालेय जीवनाच्या आठवणींनी वेढले. माजी विद्यार्थी पुन्हा एकदा वर्गात परतल्याचा आनंद अनुभवत होते. जुन्या सहकाऱ्यांशी झालेल्या गप्पांमधून खट्याळ आठवणी, शाळेतील गंमतीजमती आणि शिक्षकांची शिकवण पुन्हा जागी झाली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या जुन्या आठवणी ताज्या करुन त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शाळेला देणगी व शिक्षकांना भेटवस्तू दिल्या. तसेच शाळेची शैक्षणिक प्रगती व नव्याने उपलब्ध केलेल्या सोयी सुविधा पाहून समाधान व्यक्त केले व शाळेच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यातही मदत करण्याचा शब्द दिला.
माजी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना पाहून डोळ्यात पाणी आणणारा आनंद व्यक्त केला.”आमचे विद्यार्थी आज ही शाळेला व शिक्षकांना विसरले नाहीत. हीच आमची खरी कमाई आहे”अशा प्रकारचे भावनिक उदगार त्यांनी काढले. शाळेचे माजी शिक्षक अशोक माळी यांनी व्यक्त होताना सांगितले की, मी मराठी माध्यमाच्या शाळेतून या उर्दू माध्यमाच्या शाळेत येत असताना थोडे अवघड वाटत होते , मात्र इथे आल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक आणि संस्था पदाधिकारी यांचे प्रेम व सहकार्य लाभल्याने मी यांच्यात कधी समरस होऊन गेलो ते मलाच कळले नाही. या शाळेला मी जन्मभर विसरु शकत नाही. माजी शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून काम पाहिलेले जमालुद्दीन बंदरकर यांनी आपले विचार मांडताना, मी या शाळेचा माजी विद्यार्थीही असल्याचे सांगत आज जो काय मी आहे ही याच शाळेची देणगी आहे, तत्कालीन पदाधिकारी तसेच तत्कालीन मुख्याध्यापक इकबाल मोगल,सहकारी शिक्षक इब्राहिम उंडरे, ताहीर शिरीलकर, महंमद हुसैन सैन, गुलाम हुसैन खान, हुसैन हमदुले आदीं बाबत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेचे माजी मुख्याध्यापक इलियास पटेल यांनी जुन्या आठवणी ताज्या करत विद्यार्थी व पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे ओढा असल्याने शाळेची पटसंख्या काही प्रमाणात घटली असून ती पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे. या शाळेची उज्वल परंपरा आहे ती टिकून राहण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
संस्थेचे माजी कार्याध्यक्ष व विद्यमान सदस्य मोहम्मद पाते यांनी त्यांच्या तत्कालीन कार्याचा आढावा घेतला.
संस्थेचे कार्याध्यक्ष अब्दुल रऊफ वांगडे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत, स्वतंत्र कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, भव्य ग्रंथालय आणि नमाज साठी स्वतंत्र हॉल आधी सुविधांबाबत विवेचन करत संस्थेचे पुढील संकल्प जाहीर केले व शाळेला पुढे नेण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात याला प्रतिसाद दिला.
संस्थेचे अध्यक्ष हसन वांगडे यांनी स्नेहसंमेलनाबाबत समाधान व्यक्त करून संस्था व शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
शेवटी एकत्र जमलेल्या सगळ्यांनीच शाळेच्या आठवणींना मनापासून सलाम केला आणि भविष्यात शाळेच्या विकासासाठी आपले योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. आनंद, हशा, आठवणी आणि भावनिक क्षणांनी वाढलेले हे स्नेहसंमेलन प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी कोरले गेले.
या स्नेहसंमेलनात शाळेचे माजी मुख्याध्यापक व विद्यमान संस्था सेक्रेटरी इब्राहिम दादरकर, माजी शिक्षक व विद्यमान जॉईंट सेक्रेटरी हुसैन हमदुले, माजी शिक्षक मन्सूर खडस, माजी शिक्षिका अनुजा मकुभाई, माजी शिक्षिका जंगम मॅडम, माजी शिपाई शरद तांबे, मन्सूर उर्फ मौला म्हमदुले, संस्थेचे उपाध्यक्ष अब्दुल कादिर मुकादम, व्हाईस चेअरमन करामत मिठागरी, जॉईंट सेक्रेटरी शब्बीर राजिवटे, खजिनदार आशिक हमदुले, कॉलेज कमिटी चेअरमन रिहाना बिजले, प्रायमरी कमिटी चेअरमन इम्रान खतीब, कार्यकारणी सदस्य मोहम्मद फकीर, नजीर काळोखे, नसरीन खडस, विद्यमान मुख्याध्यापक इम्तियाज इनामदार व शिक्षक शिक्षकेतरवृंद माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हे स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थ्यांमधून साजिदा शकील मुकादम, अंजुम मुनाव्वर कडवेकर, तंजिम मुश्ताक पोटे, जुहेब चौगुले, फैसल खतीब, अब्दुल्लाह दलवी, कामिल पोटे, व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले तर शिक्षिका फातिमा इम्रान खतिब,शगुफ्ता कादिर खान दलवाई,फहिमा राशीद कादरी आदींनी त्यांना सहकार्य केले.




