कोकणात भात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मदत करावी-आ.शेखर निकम यांची अजितदादांशी मागणी
शेतकऱ्यांच्या पाठीशी- ना. अजितदादांची ग्वाही

ऑक्टोबर महिना संपला तरी अजूनही अवकाळी पाऊस, वादळे व परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. तरी ही परिस्थिती लक्षात मराठवाडा, विदर्भाप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भातील निवेदन नुकतेच मुंबईत ना. पवार यांची भेट घेऊन दिले आहे. यावर आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत अशी ग्वाही उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी यावेळी दिली
यानुसार कोकण विभागात गेल्या दोन आठवड्यापासून सतत सुरु असलेल्या अवकाळी पाऊस, वादळे व परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेले भातपीक पावसामुळे भिजून आडवे पडले असून अनेक ठिकाणी पिकांना पुन्हा कोंब फुटले आहेत. काही भागात तर शेतात पाणी साचल्याने पिके सडू लागली आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग अत्यंत चिंतेत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या भातपिकावर या नैसर्गिक आपत्तीने मोठा आघात केला आहे. यामुळे कोकणातील शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे.
कोकणातील शेतकरी अनेक संकटे झेलूनही तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत नाही. परंतु, यावर्षीची परिस्थिती अत्यंत गंभीर असून शासनाने तातडीने या परिस्थितीकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
ही बाब पाहता, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व कोकणातील तालुक्यांमध्ये तातडीने पंचनामे करावेत. व मराठवाडा व विदर्भ विभागातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जशी मदत जाहीर करण्यात आली आहे, त्याच धर्तीवर कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही योग्य त्या प्रमाणात आर्थिक मदत व भरपाई तत्काळ जाहीर करावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाच्या इमारती संदर्भात देखील आ. शेखर निकम यांनी ना. अजितदादा पवार यांच्याशी चर्चा केली
यावर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही दिली. शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट केले.
तर परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना ठोस नुकसान भरपाई मिळेपर्यंत शासनाकडे पाठपुरावा सुरूच राहील, असे आमदार शेखर निकम यांनी स्पष्ट केले आहे.



