महाराष्ट्र

खेर्डी चे आकाश लकेश्री हिमालयीन एक्स्ट्रीम टायथलॉन मध्ये चमकले

वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी पात्र

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील आकाश लकेश्री यांनी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून चिपळूणचे नाव उंचावले आहे. एकूण आठ तास बावन्न मिनिटांत ही आव्हानात्मक स्पर्धा पूर्ण करत त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आहे. देशातील फार थोडे खेळाडू एवढ्या कठीण स्पर्धेत उतरतात, त्यात आकाश यांनी मिळवलेले यश उल्लेखनीय मानले जात आहे.

हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन ही जगातील सर्वाधिक अवघड स्पर्धांपैकी एक मानली जाते. या स्पर्धेत पोहणे, सायकलिंग व धावणे या तीन टप्प्यांचा समावेश असतो. प्रचंड थंड वातावरण, खडतर पर्वतीय मार्ग, कमी ऑक्सिजन आणि तीव्र चढ-उतार यांच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना आपली शारीरिक व मानसिक क्षमता सिद्ध करावी लागते. या स्पर्धेत आकाश लकेश्री यांनी पोहण्याच्या २.८ किलोमीटर अंतरासाठी १७ ते १८ अंश तापमानाच्या थंड पाण्यात अवघ्या ५३ मिनिटांचा वेळ घेतला. त्यानंतरच्या ८८ किलोमीटर सायकलिंग टप्प्यात २४०० मीटर चढाचा सामना करत चार तास २७ मिनिटांत त्यांनी हा टप्पा पूर्ण केला. शेवटचा आणि सर्वात कठीण मानला जाणारा २१ किलोमीटर धावण्याचा टप्पा १७०० मीटर चढासह तीन तास २१ मिनिटांत पूर्ण करत त्यांनी एकूण आठ तास ५२ मिनिटांत स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.

आकाश लकेश्री हे मूळचे खेर्डी येथील असून सध्या ते पुण्यात वास्तव्यास आहेत. २०१८ साली त्यांनी स्पोर्ट्स मॅनेजमेंटमधून एमबीए सुरू केले होते; मात्र फी भरण्यासाठी निधीअभावी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. याच काळात त्यांनी ट्रायथलॉन हा खेळ निवडत आयुष्याला नवे वळण दिले. पुण्यातील दोन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशिक्षणास प्रारंभ केला. स्पोर्ट्स मॅनेजमेंट संस्थेत काम करताना त्यांचा सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या संपर्कात येण्याचा योग आला. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घेत २०१८पासून त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षणाला गती दिली.

२०२०मध्ये दुबईमध्ये स्थानिकांच्या मदतीने त्यांनी पहिली मोठी ट्रायथलॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. लॉकडाऊनच्या काळात ते चिपळूणमध्ये परतले आणि २०२१मध्ये रत्नागिरी येथे कोचिंग सुरू केले. त्यानंतर २०२२-२३ मध्ये पुन्हा पुण्यात स्थलांतर करून त्यांनी क्रीडा प्रशिक्षण सुरू ठेवले. २०२४मध्ये त्यांनी ‘स्काय एंडुरन्स क्लब’ या नावाने स्वतःचे कोचिंग सेंटर सुरू केले. आर्थिक पाठबळ नसतानाही त्यांनी स्वतःच्या मेहनतीतून नेपाळमध्ये झालेल्या एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून या स्पर्धेत भाग घेणारे भारतातील पहिले खेळाडू ठरले.

हिमालयीन स्पर्धेच्या तयारीसाठी त्यांनी लेह–लडाख येथे कठोर प्रशिक्षण घेतले. त्या काळात भारत–पाकिस्तान तणावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ते लेहमध्येच अडकले होते. मात्र प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी सराव सुरू ठेवला आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर आजचे उल्लेखनीय यश प्राप्त केले. त्यांच्या मेहनतीचा आणि चिकाटीचा हा सुंदर परिपाक असल्याचे क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी नमूद केले आहे.

आजवरच्या आपल्या या प्रवासात अभिजीत यादव, सचिन खेर, संजय इथापे, विजय अनपट, शंतनु शितोळे यांचे मार्गदन सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले

आकाश लकेश्री यांच्या या यशामुळे चिपळूणचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उजळले आहे. आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ते भारताचे प्रतिनिधित्व करणार असून त्यांच्या पुढील प्रवासासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!