इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र महिला विंगच्या अध्यक्षपदी डॉ.कांचन मदार
महिला डॉक्टरांच्या प्रश्नांना नवे व्यासपीठ मिळणार

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्य महिला डॉक्टर विंग कमिटीच्या अध्यक्षपदी डॉ. कांचन मदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. IMA महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी ही नियुक्ती जाहीर केली. त्यांच्या नियुक्तीमुळे राज्यभरातील महिला डॉक्टरांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फुटेल, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.
डॉ. कांचन मदार या एक अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ (गायनॅकोलॉजिस्ट) तसेच मेडिको-लीगल कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक जाणिवेतून त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्या WSW (Women Support Women) या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष असून महिलांच्या आरोग्य, कायदेशीर साक्षरता, कार्यस्थळावरील सुरक्षितता व व्यावसायिक संरक्षण या विषयांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे.
IMA महाराष्ट्र महिला डॉक्टर विंगच्या माध्यमातून महिला डॉक्टरांना येणाऱ्या व्यावसायिक, कायदेशीर व मानसिक अडचणी, कार्यस्थळावरील भेदभाव, सुरक्षिततेचे प्रश्न तसेच वैद्यकीय क्षेत्रातील बदलत्या आव्हानांवर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. मदार यांचे नेतृत्व मोलाचे ठरणार आहे. महिला डॉक्टरांसाठी प्रशिक्षण शिबिरे, कायदेशीर मार्गदर्शन कार्यशाळा, आरोग्यविषयक जनजागृती मोहिमा तसेच सल्ला व सहकार्य मंच उभारण्यावर त्यांचा भर राहणार असल्याचे सांगितले जाते.
IMA महाराष्ट्र राज्य महिला डॉक्टर विंग कमिटीत पदसिद्ध सदस्य (Ex-officio Members) म्हणून IMA महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी आणि मानद राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई यांचा समावेश आहे. या अनुभवी नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली महिला डॉक्टर विंग अधिक सक्षम, संघटित व प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. कांचन मदार यांच्या नियुक्तीबद्दल राज्यभरातील डॉक्टर समुदायाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महिला डॉक्टर विंग अधिक सक्षम व परिणामकारक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




