
संपूर्ण कोकणात चर्चेत असणारा स्वतंत्र कोकण राज्य अभियान पुरस्कृत “कोकण रत्न पुरस्कार” सोहळा मुंबई येथील आझाद मैदान शेजारी असलेल्या पत्रकार भवन येथे स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.कोकणातील सामाजिक,सांस्कृतिक,क्रीडा,साहित्य अशा विविध क्षेत्रात प्रभावी तसेच निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्वांना सदर संस्थेच्या वतीने “कोकणरत्न पदवी पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.यामध्येच कोकणच्या लोककलेतील एक लक्षवेधी नाव म्हणजे शाहीर शाहिद खेरटकर यांना देखील “कोकणरत्न” पदवी प्रदान करण्यात आली.शाहीर शाहिद खेरटकर यांनी कोकण आणि महाराष्ट्राच्या विविध भागात आपल्या काव्य,गायन,वक्तृत्व,आणि वैचारिक प्रबोधनाच्या माध्यमातून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवलेला आहे.जाती धर्माच्या पलिकडे जाऊन समतावादी विचार पेरण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते गेली अनेक वर्षे सातत्याने करत आहेत,आणि त्यांना सर्वच समाजघटकांनी निर्विवादपणे स्वीकारले आहे. भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांची नागरिकांना जाणीव करून देण्याचे शाहिद खेरटकर करत असलेले कार्य अधोरेखित करण्यासारखे आहे.कोकण प्रांताविषयी त्यांना विशेष प्रेम आहे.इथली लोकसंस्कृती,इथला निसर्ग,इथल्या बोलीभाषा याबद्दलचा अभिमान त्यांच्या लेखणीतून सतत उमटलेला पहायला मिळतो.त्यांचे “कोकण जिंदाबाद” हे गीत लोकप्रिय ठरलेले आहे ज्यामध्ये त्यांनी आपल्या मनातील कोकण आणि त्यातला अभिमान रेखाटला आहे.कलाकार सामाजिक परिवर्तनाचा धागा बनू शकतो हे त्यांनी आपल्या वर्तनातून नेहमीच दर्शवले आहे.त्यांच्या शाहीर,कवी,निवेदक,वक्ता आणि पत्रकार या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची दखल आजवर अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांनी घेतली असून त्यांना असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.शाहीररत्न,कलारत्न,काव्यरत्न,सह्याद्री रत्न,समता भूषण,मराठा भूषण,समाज प्रबोधनकार यासारख्या अनेक पुरस्कारांना गवसणी घालण्यात ते यशस्वी ठरले आहेत त्याचबरोबर त्यांच्या “ललकारी” या कविल्यसंग्रहास सुद्धा अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत मात्र “कोकणरत्न” म्हणून हा पहिलाच सन्मान असल्याने आपल्याला विशेष आनंद झाल्याचे शाहिद खेरटकर यांनी आपल्या मनोगतातून बोलून दाखवले.त्यांच्या एकूण सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवासाला अधिक बळ देण्यासाठी हा पुरस्कार सुद्धा महत्वाचा वाटतो.सदरच्या पुरस्कार प्राप्तीनंतर शाहिरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोकणरत्न पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १३ डिसेंबर रोजी पत्रकार भवन,मुंबई याठिकाणी प्रचंड गर्दीत संपन्न झाला.सोहळ्या प्रसंगी स्वतंत्र कोकणराज्य अभियानचे संस्थापक- अध्यक्ष श्री संजय कोकरे,प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार,संपादक श्री.सचिन कळझूनकर उपस्थित होते.तसेच पदाधिकारी धनंजय कुवसेकर,खजिनदार राजेंद्र सुर्वे, सुभाष राणे यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते.




