मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघात : भोस्ते घाटात ८ तास वाहतूक कोंडी

प्रतिनिधी (मंगेश जाधव)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी भोस्ते घाटात कंटेनरचा भीषण अपघात झाला. यामध्ये चालक विकास सिंह गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने भरणे येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे.या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल आठ तास ठप्प झाली होती.
बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास डीडी-०३ आर- ९९७३ क्रमांकाचा कंटेनर भोस्ते घाटातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनरचा अपघात झाला. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दुपारी २ वाजेपर्यंत कंटेनर रस्त्यातच अडकून पडल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्यानंतर प्रशासनाने कंटेनर बाजूला करण्याचे काम हाती घेतले. हे काम सुरू असताना मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून वाहतूक वळवण्यात आली होती मात्र यामुळे गाड्यांचा वेग मंदावला.तब्बल आठ तासांच्या प्रयत्नांनंतर परिस्थिती पूर्वपदावर आली, मात्र या प्रदीर्घ वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.




