चिपळूण मध्ये बेकायदेशीर गुटखा विक्री विरोधात कारवाईची मागणी

चिपळूण : महाराष्ट्र लोकअधिकार समितीचे विभागीय संघटक अनिकेत शेखर साळवी यांनी चिपळूण तालुका व शहरातील बेकायदेशीर गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या विक्री आणि साठवणुकीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत चिपळूण पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले.
निवेदनात शहरातील मुख्य बाजारपेठा, बसस्थानक परिसर तसेच शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बेकायदेशीर व्यवसायामुळे युवक व शालेय विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असून त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी तातडीने छापेमारी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच गुटखा विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन (FDA), जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.



