महाराष्ट्र

नेरुळ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा गुणगौरव

महिला हिरकणी पुरस्काराने सन्मानित

नवी मुंबई : नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विद्यमाने जागतिक महिला दिन १२ मार्च २०२६ रोजी, संघाच्या नेरुळ येथील गणेश सभागृहात उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या एकूण आठ कर्तबगार महिलांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती सुजाता पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसंगी व्यासपीठावर श्रीमती वंदना शिंदे, श्रीमती वृषाली मगदूम, नगरसेविका श्रीमती नेत्रा शिर्के, श्रीमती माधुरी सुतार, श्रीमती स्वप्ना गावडे, संघाचे अध्यक्ष विकास साठे, पोलीस अधिकारी श्रीमती माधुरी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीमती शालिनी इंगळे, श्रीमती रुचिता कर्पे, श्रीमती कल्पना गायकवाड, श्रीमती भारती बिरामणे, श्रीमती सुरेखा शिवशरण, श्रीमती पाकीजा अत्तार, श्रीमती स्नेहल नाईक, श्रीमती भावना काळे व छोटी हिरकणी कुमारी उल्का सावंत आदी समाजात विविध स्तरावर उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा महापौरांच्या हस्ते हिरकणी पुरस्कार – २०२६ देऊन सन्मान करण्यात आला.

उपस्थितांशी संवाद साधताना महापौर सुजाता पाटील म्हणाल्या की नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे महिलांसाठी वाहन चालकाचे प्रशिक्षण उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये महिलांना रोजगार संधी उपलब्ध होईलच, त्याचप्रमाणे विविध स्तरावर महिलांचे अधिक सक्षमीकरण होणे गरजेचे आहे, त्यादृष्टीनेही महानगरपालिका प्रयत्नशील आहे.

हिरकणी पुरस्कार प्राप्त श्रीमती शालिनीताई इंगळे, श्रीमती रुचिता कर्पे, यांनी प्रतिनिधिक स्वरुपात छान भाषण केले. तसेच छोटी हिरकणी कुमारी उल्का सावंत हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविण्याबद्दल तिचाही महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कुमारी उल्काने महिला दिनावर तसेच डॉक्टर किंजवडेकर जयंती संदर्भात सुरेख भाषण करुन श्रोत्यांची मने जिंकली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष निमंत्रित प्राध्यापिका श्रीमती वृषाली मगदूम यांनी स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि कायदे या संदर्भात विस्तृत माहिती दिली. प्रमुख वक्त्या श्रीमती वंदना शिंदे यांनी अंधश्रद्धेचे महिलांच्या मध्ये प्रमाण फार आहे, सगळी व्रतवैकल्ये महिलांसाठीच आहेत. महिलांनी त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, चौकसपणा बाळगला पाहिजे असे त्यांनी मार्मिकपणे सांगितले. या प्रसंगी त्यांनी बुवाबाजीचे प्रात्यक्षिकही उपस्थितांना करून दाखविले आणि श्रोत्यांची वाहवा मिळवली. प्रसंगी नगरसेविका श्रीमती नेत्रा शिर्के, श्रीमती माधुरी सुतार, श्रीमती स्वप्ना गावडे, श्रीमती माधुरी पाटील यांनी महिला दिनानिमित्त उपस्थितांना संबोधित केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात विकास साठे यांनी महिलांना शुभेच्छा देऊन सांगितले की आज महिलांनी सर्व क्षेत्रात चौफेर प्रगती केलेली आहे, मात्र महिलांना हे स्थान मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान आहे याचे स्मरण ठेवावे असे त्यांनी सूचित केले.

अजय माढेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या संपूर्ण कार्यकारिणीने सांघीक वृत्तीने व मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वी केला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
——————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!