
प्रतिनिधी :(मंगेश जाधव)
मराठी साहित्याला जागतिक पटलावर नेणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व कादंबरीकार प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या “The Last Folktale” या इंग्रजी कादंबरीची जगभरातील साहित्यवर्तुळात उल्लेखनीय दखल घेतली जात आहे. मराठीतील “शेवटची लाओग्राफिया” या प्रायोगिक कादंबरीचा ज्येष्ठ अनुवादक डॉ. विलास साळुंखे यांनी केलेला इंग्रजी अनुवाद २०२५ मध्ये प्रकाशित झाल्यानंतर इंग्लंड, अमेरिका, नेदरलँड्स, ग्रीस, चीन तसेच देशातील विविध राज्यांमधून तिच्यावर समीक्षात्मक लेख आणि अभिप्राय प्रसिद्ध झाले आहेत.
या कादंबरीला २०२२ च्या बुकर पुरस्कार विजेत्या Geetanjali Shree यांनी शुभेच्छा देताना, “ही सर्जनशील कादंबरी जगभरातील वाचकांना भावेल,” असे मत व्यक्त केले आहे. तर २०२५ च्या बुकर पुरस्कार विजेत्या Banu Mushtaq यांनीही कादंबरीच्या प्रकाशनाचे स्वागत करत लेखक आणि अनुवादकाचे अभिनंदन केले आहे.
इंग्लंडमधील austinmacauley.com च्या संपादकीय मंडळाने कादंबरीचे वर्णन “रोमहर्षक, प्रभावी आणि व्यापक वाचकवर्गाला आकर्षित करणारी साहित्यकृती” असे केले आहे. संपादकीय मंडळाच्या अहवालात कथानकाची बांधणी, लोककथा आणि मिथकांचा वापर, तसेच मानवी अनुभवांचे सखोल चित्रण यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.
नेदरलँड्समधील साहित्य समीक्षक भास्कर हांडे यांनी The Last Folktale ला “क्लासिक कादंबरी” संबोधत मराठी संस्कृती आणि जागतिक साहित्यिक संवेदना यांचा संगम घडविणारी कलाकृती असल्याचे म्हटले आहे. त्यांनी लबडे यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव करत ही कादंबरी मराठी साहित्याच्या जागतिकीकरणातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे नमूद केले आहे.
अमेरिकेतील कवयित्री नयना निगळे यांनी या कादंबरीचे वर्णन “अवांत-गार्द, उच्च साहित्यिक मूल्य असलेली आणि मराठी कादंबरीच्या शक्यता नव्याने परिभाषित करणारी कलाकृती” असे केले आहे. लोककथेला अस्तित्ववादी चिंतनाचे माध्यम बनविण्याचा कादंबरीचा प्रयत्न त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केला आहे.
याशिवाय केरळमधील समीक्षक सिजो जोसेफ चेनलील यांनी The Last Folktale ला “पाथ-ब्रेकिंग नॉव्हेल” संबोधत मॅजिक रिअॅलिझम, उत्तरआधुनिकता आणि अस्तित्ववादी चिंतन यांचा प्रभावी संगम साधणारी २१व्या शतकातील उल्लेखनीय साहित्यकृती असल्याचे मत नोंदविले आहे.
विशेष म्हणजे, कादंबरीवरील समीक्षात्मक लेख प्रतिष्ठित, समवयस्क-समीक्षित (Peer Reviewed) आणि यूजीसी-केअर सूचीतील Journal of Rajasthan Association for Studies in English (RASE) मध्येही प्रसिद्ध झाला आहे. या लेखात कादंबरीला भारतीय लोककथा, उत्तरआधुनिक कथनतंत्र आणि समकालीन सामाजिक वास्तव यांचा अभिनव संगम म्हणून गौरविण्यात आले आहे.
मराठीतील प्रायोगिक कादंबरीचे जागतिक साहित्यविश्वात प्रतिनिधित्व करणाऱ्या The Last Folktale मुळे प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या साहित्याला नव्या आंतरराष्ट्रीय वाचकवर्गाची दारे खुली झाली असून, मराठी साहित्याच्या जागतिक प्रतिष्ठेत भर पडत असल्याची भावना साहित्यवर्तुळातून व्यक्त होत आहे.



