असगणी सब स्टेशनला अखेर मिळाले अधिकृत नाव : संदीप फडकले यांच्या पाठपुराव्याला यश
असगणी ग्रामस्थांमध्ये समाधान

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या असगणी ग्रामपंचायत हद्दीतील MSCB सब स्टेशनच्या नामांतराचा तब्बल दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या यशामागे माजी खेड तालुका अध्यक्ष मनसे श्री. संदीप हरी फडकले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
यापूर्वी या सब स्टेशनला “लवेल” नावाने ओळखले जात होते. मात्र असगणी ग्रामपंचायतीकडून वारंवार “असगणी सब स्टेशन” असे नाव देण्याची मागणी करण्यात येत होती. गेल्या सहा महिन्यांपासून संदीप फडकले यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवला होता.
त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून MSCB चे अधिकारी श्री. मानकर साहेब यांनी सब स्टेशनच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला. दिनांक २२ मे २०२६ रोजी “महावितरण संकुल असगणी ग्रामपंचायत” असा अधिकृत बोर्ड सब स्टेशनवर लावण्यात आला.
तब्बल दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली निघाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मानकर साहेब आल्यापासून विभागात चांगली कामे होत असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली.
या कामासाठी असगणी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य तसेच संदीप फडकले यांचे सहकारी अजय अनंत शिगवण, राजेंद्र हरिभाऊ धाडवे यांनीही मोलाचे सहकार्य केले. संदीप फडकले यांनी MSCB चे अधिकारी श्री. मानकर साहेब यांचे विशेष आभार मानले असून, असगणी ग्रामपंचायतीतर्फेही त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.




