महाराष्ट्र

परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा जल्लोषात साजरा

*परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा जल्लोषात साजरा..!*

*नाशिक (प्रतिनिधी) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख आणि कोट्यवधी सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा त्र्यंबकेश्वर येथील श्रीगुरुपीठ प्रकल्पावर हजारो सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत अभूतपूर्व जल्लोषात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मिरवणूक, ग्रंथतुला, प्रसाद वाटप आणि हितगुज असे उपक्रम उत्साही वातावरणात पार पडले.**

सकाळपासून त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात राज्यभरातून आलेल्या महिला पुरुष सेवेकर्‍यांनी गर्दी केली होती.सकाळी आरती झाल्यानंतर सेवेकर्‍यांच्या वतीने गुरुपीठ परिसरात एक छोटेखानी मिरवणूक काढण्यात आली. यात राज्यभरातून आलेल्या महिला सेवेकर्‍यांनी सादर केलेले लेझीम तसेच टाळ नृत्य आकर्षणाचे केंद्र ठरले. मुख्य कार्यक्रमात गुरुमाऊलींची ग्रंथतुला करण्यात आली व या ग्रंथांचे सेवेकर्‍यांना मोफत वाटप करण्यात आले. गुरुमाता सौ. मंदाकिनीताई मोरे यांनी त्यांचे औक्षण केले. पंढरपूर व आळंदी देवस्थान, संजीवनी साखर कारखाना, बँक ऑफ महाराष्ट्र यासह पंचवीस संस्थांनी गुरुमाऊलींचा सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. वेदमूर्ती विजयआप्पा शिखरे यांनी शांती मंत्राचे पठण तर मुकुंदराव कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

*सेवेच्या माध्यमातून परिस्थितीचा सामना करा- गुरुमाऊली*

यावेळी समस्त सेवेकरी परिवाराला संबोधित करताना गुरुमाऊली श्री. मोरे म्हणाले की,
सध्या सुरू असलेल्या अमेरिका, एझराईल आणि इराण युद्धामुळे जगभर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून या परिस्थितीचा सामना भारतातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांना करावा लागतो आहे.या युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसली असून यातून तिसऱ्या महायुद्धाची जणू सुरुवातच झाली असून खरोखरच तिसरे महायुद्ध पेटले तर संपूर्ण मानव जातीचा आणि जीवसृष्टीचा संहार व्हायला वेळ लागणार नाही म्हणूनच श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने गेल्या सात दिवसांपासून विशेष अध्यात्मिक सेवा हाती घेण्यात आली असून देशभरातील लाखो सेवेकरी प्रत्यंगिरा मातेस चंडीयागाच्या माध्यमातून साकडे घालत आहे. हे युद्ध लवकरात लवकर थांबावे आणि संपूर्ण मानव जातीची या निमित्ताने होणारी वाताहातही थांबावी व पुन्हा जगभर शांतता नांदावी अशी प्रार्थना माता भगवतीस सेवेकरी घालत आहेत.जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी यात सहभागी होऊन भारत मातेची सेवा करावी असे आवाहन गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे यांनी केले.

  1. ते पुढे म्हणाले की,याआधी कारगिल युद्ध असो की हॉटेल ताजवरील अतिरेक्यांचा भ्याड,भयानक हल्लाअसो,दुष्काळ,जलप्रलय,अतिवृष्टी,तसेच आजारांच्या साथी अशी भयानक संकटे आली तेव्हा सेवेकर्‍यांनी एकत्र येऊन विविध स्वरूपाची आध्यात्मिक सेवा मोठ्या प्रमाणात रुजू केली व त्याचे चांगले परिणाम वेळोवेळी दिसून आले. म्हणूनच आता पुन्हा एकदा देशभरातील लाखो सेवेकर्‍यांनी एकत्र येऊन माता भगवतीस हे साकडे घालावयाचे आहे आणि आपल्या सर्वांची माता आपल्या हाकेस ओ देऊन निश्चितच धावून येईल आणि हे युद्ध सुद्धा लवकरच थांबेल आणि संपूर्ण जगभर शांतता नांदेल असा विश्वासही गुरुमाऊलींनी व्यक्त केला. याप्रसंगी गुरुमाता सौ मंदाकिनी मोरे,गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे,गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे आणि सतीश मोटे हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!