महाराष्ट्र

चिपळूण येथे डॉ.सानिका वाजे यांच्या अत्याधुनिक ‘सीबीसीटी सेंटर’ चा शुभारंभ

मान्यवरांची उपस्थिती

चिपळूण : कोकणातील दंतवैद्यकीय आणि मुखरोग निदान क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची एक मोठी आणि नवी भर पडली आहे.डॉ. सानिका राजेश वाजे यांनी चिपळूण येथे अत्याधुनिक अशा डायग्नोटेड सीबीसीटी सेंटरची सुरुवात केली आहे. मुख, जबडा आणि चेहऱ्याशी संबंधित गंभीर आजारांचे अचूक आणि प्राथमिक टप्प्यावरच निदान करणारी ही अत्याधुनिक सुविधा आता चिपळूणमध्ये उपलब्ध झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची वैद्यकीय सेवा मानली जात आहे.

विशेष बाब म्हणजे, रत्नागिरी ते पनवेल दरम्यान ओरल अँड मॅक्सोफेशियल रेडिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. सानिका वाजे या एकमेव तज्ज्ञ ठरल्या असून,कोकणातील पहिल्या महिला तज्ज्ञ म्हणून त्यांची नवी ओळख निर्माण झाली आहे.

चिपळूण शहरातील विजय मेडिकलच्या वरती सुरू करण्यात आलेल्या या डायग्नोटेड सीबीसीटी सेंटर’चा शानदार शुभारंभ माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या हस्ते संपन्न झाला.या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी ज्येष्ठ दंतवैद्य डॉ. जयंत महेंदळे, सामाजिक कार्यकर्ते विजयशेठ माटे, राष्ट्रवादीचे नेते जयंद्रथ खताते, राजेश वाजे, संजय वाजे, डॉ. अभिजीत सावंत, डॉ. मंगेश वाजे, डॉ. मीनल थत्ते आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच आमदार शेखर निकम यांनीही डॉ. सानिका वाजे यांना भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांमध्येच मर्यादित असलेली ही थ्री-डी (3D) एक्स-रे स्कॅन सुविधा आता चिपळूणमध्ये आणण्यात आली आहे.सामान्य एक्स-रेमध्ये केवळ दोन-आयामी (2D) चित्र मिळते; मात्र सीबीसीटी मशीनद्वारे दात, जबडा आणि संपूर्ण चेहऱ्याचे थ्री-डी स्कॅनिंग केले जाते, ज्यामुळे अंतर्गत रचना स्पष्ट दिसते.या अत्याधुनिक यंत्रणेचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अत्यंत कमी रेडिएशनमध्ये अचूक निदान शक्य होते.

दंत इम्प्लांटचे अचूक नियोजन, रूट कॅनल उपचार, अक्कलदाढीची क्लिष्ट तपासणी, सांध्यांची झीज, चेहऱ्यावरील फ्रॅक्चर, सायनस आणि मुखाचा कर्करोग (कॅन्सर) कितपत पसरला आहे, याची खात्रीशीर माहिती या स्कॅनमुळे मिळते.

चिपळूणच्या गद्रे हायस्कूलमधून प्राथमिक आणि डीबीजे महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. सानिका यांनी कोल्हापूरच्या तात्यासाहेब कोरे डेंटल कॉलेजमधून बीडीएस (BDS) पदवी घेतली. त्यानंतर पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड डेंटल कॉलेजमधून त्यांनी डेंटल सर्जरीमध्ये मास्टर्स केले. २०२५ मध्ये त्यांनी ‘ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी’ या विषयात आपली मास्टर पदवी पूर्ण केली असून मुंबईतील सीबीसीटी सेंटरमध्ये व्यावसायिक अनुभव घेतला आहे.त्यांनी देशातील नामांकित टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणूनही काम केले आहे. लखनऊ येथे झालेल्या असोसिएशन परिषदेत त्यांनी सादर केलेल्या ‘नॉन-थर्मल प्लाझ्माद्वारे कर्करोग उपचार’ या शोधनिबंधाला (केस प्रेझेंटेशन) विशेष पुरस्कार मिळाला होता.

मुखातील कोणताही विकार गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वी त्याचे अगदी सुरुवातीच्या टप्प्यात निदान होणे गरजेचे असते.गुटखा, तंबाखूमुळे होणारे आजार, तोंडातील जखमा आणि गाठी यांवर वेळीच उपचार झाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. हेच अचूक निदान आता कोकणात उपलब्ध झाले आहे.

डॉ. सानिका यांचे वडील राजेश वाजे हे चिपळूणमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक व क्रेडाई संस्थेचे सक्रिय पदाधिकारी आहेत, तर डॉ. मंगेश वाजे हे सीजीपीएचे माजी अध्यक्ष आहेत.वैद्यकीय क्षेत्रातील एका अत्यंत आव्हानात्मक आणि आधुनिक शाखेत पाऊल टाकत डॉ. सानिका वाजे यांनी ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी सोय केली असून, त्यांच्या या उपक्रमाचे संपूर्ण कोकणातून कौतुक होत आहे.

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!