घाव वर्मी बसला, प्रशासन खडबडून जागे झाले ; वीर -देवपाठ रस्ता कामासाठी अखेर निविदा जाहीर
जिल्हा परिषद सदस्या तथा स्थायी समिती सदस्या शिवानी सावंत यांच्या पाठपुराव्याला यश

चिपळूण:-तब्बल अडीच कोटी मंजूर होऊन देखील चार महिने लालफितीत अडकलेल्या वीर-देवपाठ रस्त्याबाबत जिल्हापरिषद सदस्या तथा स्थायी समिती सदस्या सौ.शिवानी सावंत यांनी आक्रमकपणे आवाज उठवून थेट पालकमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली.हा घाव इतका वर्मी बसला की प्रशासन अक्षरशा खडबडून जागे झाले.आणि रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ७५ लाख रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली.त्यामुळे या रस्ता कामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
चिपळूण तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग असलेला वीर,रानपाट,लोहरवाडी,देवपाट,पेढांबे,कळबुशी,नायशी,कोकरे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्यानंतर या १० किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी अडीच कोटी रुपये फेब्रुवारी महिन्यात मंजूर करण्यात आले होते.तसेच या कामाला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देखील देण्यात आली होती.परंतु तांत्रिक मान्यतेच्या कागदपत्रांवर कोणतीही तारीख नमूद नसल्याचे व निधी मंजूर होऊन देखील चक्क चार महिने हा रस्ता कागदावरच असल्याचे जिल्हापरिषद सदस्या शिवानी संदीप सावंत यांच्या निदर्शनास येताच त्या कमालीच्या संतापल्या आणि त्यांनी थेट पालकमंत्री उदयजी सामंत यांच्याकडे धाव घेऊन कारवाईची मागणी केली होती.
सौ.शिवानी सावंत यांनी अतिशय योग्य ठिकाणी हा घाव घातल्याने घाव वर्मी बसला.पालकमंत्री उदयजी सामंत यांनी देखील या विषयाची गंभीर दखल घेऊन योग्य शब्दात कानपिचक्या दिले आणि प्रशासन अक्षरशा खडबडून जागे झाले.पावसाळी हंगामात निविदा प्रसिद्ध करता येत नाही हे देखील प्रशासन विसरून गेले आणि रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ७५ लाख रुपयांची निविदा जाहीर केली.पावसाळा धरून १२ महिने या कामाची मुदत देण्यात आली आहे.निधी मंजूर होऊन देखील गेले चार महिने जे काम कागदावर राहिले होते,ते कामासाठी अवघ्या २४ तासात कार्यवाही पूर्ण करण्यात आली.त्यामुळे”केल्याने होतंय रे,आधी केलंच पाहिजे”याचा प्रत्येय देखील आला आहे.
निविदा जाहीर करून काम संपले या भ्रमात प्रशासनाने राहू नये,कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात काम सुरू होऊन संपेपर्यंत या कामाचा पाठपुरावा मी करणार आहे.तसेच ग्रामीण भागातील अत्यंत महत्वाचा हा रस्ता दर्जेदार होण्यासाठी तज्ञमंडळीसह मी स्वतः कामाच्या ठिकाणी पाहणी करणार असल्याचे सौ.शिवानी सावंत यांनी स्पष्ट केले आहे.







